ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फक्त खातेबदल करून जनतेची दिशाभूल; मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवा ; राऊत

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यास सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “सरकार मंत्र्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. कितीही रंगसफेदी केली तरी सरकारची प्रतिमा कलंकित झाली आहे. महाराष्ट्राच्या भाळी डाग लागला असून तो अशा तात्पुरत्या निर्णयांनी पुसला जाणार नाही. शेवटी या मंत्र्यांना जावेच लागेल,” असा ठाम दावा राऊत यांनी केला.

राऊत यांनी यापूर्वी सहा ते सात मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील, असा इशारा दिला होता. मात्र, अद्याप केवळ दोन मंत्र्यांच्या खात्यांत बदल करण्यात आला आहे. यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “केवळ खात्यांतील फेरबदल हा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.

राऊत यांनी वसई महापालिकेतील आयुक्तांवर पडलेल्या कारवाईचा उल्लेख करत सांगितले की, “हे तब्बल 1000 कोटींचे प्रकरण आहे आणि त्यामध्ये एका मंत्र्याला पद सोडावे लागणार आहे.” ते पुढे म्हणाले की, “सध्याचे नवे क्रीडा मंत्री यांना खरेतर हेच खाते शोभते. त्यांची हीही नियुक्ती तात्पुरतीच आहे.”

राऊत यांनी दावा केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून, या भेटीत राज्यातील काही मंत्र्यांमुळे काम करणे कठीण झाले आहे, असे फडणवीसांनी शहांना सांगितले आहे. “सरकार आणि राज्याची यामुळे बदनामी होत आहे, म्हणून आता निर्णय घ्यावा लागेल, असं फडणवीसांनी शहांना सांगितल्याचं माझ्याकडे माहिती आहे,” असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!