धुळे : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेचा दोन कोटी महिलांनी लाभ घेतला. या योजनेत काही जणांनी फसवणूक करून गैर मार्गाने सरकारचे पैसे मिळवले. मात्र राज्यभरात आता विविध अर्जांची फेरपडताळणी सुरू करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील एका महिलेने लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात झालेली चूक स्वतःहून मान्य केली. भिकूबाई खैरनार नावाच्या महिलेने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरला पण त्यांच्या खात्यात पैसे न येता त्यांच्या मुलाच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या महिलेने स्वतः पुढे येऊन ही चूक मान्य केली आणि आतापर्यंत मिळालेले सर्व पैसे शासनाकडे परत केले. भिकू बाई यांनी चुकून त्यांच्या मुलाचे आधार कार्ड दिल्याने, त्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये पैसे आले होते त्यामुळे शासनाने टाकलेल्या साडेसात हजार रुपये हे त्यांच्या मुलाच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले होते. मुलाच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आल्याचं लक्षात आल्यानंतर भिकुबाई यांनी प्रशासनाकडे हे पैसे परत कारण्यासाठी अर्ज केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर, या महिलेकडनं साडेसात हजार रुपये परत घेत शासनाकडे जमा केले आहेत. यानंतर योग्य कागदपत्र लावून पुन्हा या योजनेचा लाभ त्यांना मिळत असल्याने त्यांनी शासनाचे आभार मानले.