अक्कलकोट, दि.29 : गेल्या तीन दिवसापासून तीर्थक्षेत्र अक्कलकोटनगरी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी लाखो भाविक श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, बुधवार पेठेतील समाधी मठ, महाप्रसादाकरिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दाखल होत असल्याने मंदिर समितीस व प्रशासनास गर्दीचा अंदाज न आल्याने स्वामी भक्तांना सुलभ दर्शन होण्याकामी करावयाचे उपाय योजना करिता शनिवारी दस्तुरखुद्द आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पाहणी केले. मंदिर समितीस व प्रशासनास सूचना करण्यात आल्या.
दिपावली सुट्टीनिमित्त राज्यासह परराज्य परदेशातून स्वामीभक्तांची श्रीक्षेत्र अक्कलकोट नगरीत गेल्या तीन दिवसापासून अलोट गर्दी लाखो भक्त, शेकडो वाहने, जिकडे पाहिल तिकडे गर्दीच गर्दी अशा परिस्थितीत मंदिर समिती व प्रशासनावर ताण पडला होता. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील अद्यावत वाहन तळामुळे शेकडो वाहने थांबण्याची व्यवस्था झाल्याने वाहनधारकांचा ताण हलका होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. या बरोबरच महाप्रसादकरिता गर्दीचा अंदाज घेवून न्यासाच्या पदाधिकार्यांनी तातडीने उपाय योजना केल्याने आलेल्या भक्तांना सुलभरित्या महाप्रदाचा लाभ मिळाला.
गेल्या तीन दिवसापासून अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने भाविकांना दर्शन सुलभरीत्या घेता यावे व त्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने शनिवारी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे स्वतः मंदिर परिसरात पोहोचले व गर्दीत थांबून व्यवस्थित रांग लावून भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दर्शनाचे नियोजन करण्याकामी मंदिर समितीस व प्रशासनास करावयाच्या विविध उपाय योजनेबाबत सूचना करण्यात आल्या.
राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी टॉप फाईव्हमधील श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांची नगरी म्हणून शासन दरबारी नोंद आहे. राज्यातील अन्य तीर्थक्षेत्राप्रमाणे विकास कामे 10 वर्षे अगोदर होणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराने याचा फटका स्वामीभक्तांना बसत असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील अन्य तीर्थक्षेत्राप्रमाणे मंदिर परिसरातील अतिक्रमणे, पूर्वीपासून असलेल्या रहिवाशांचे स्थलांतरन, अरुंद रस्ते, राज्य विद्युत वितरण कंपनीचे आडवे-तिडवे इलेक्ट्रीक पोल, सांड पाण्याचा निचरा, घाणीचे साम्राज्य पार्किंग झोन, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता गृहे, शासनाचे भक्त निवास, आवश्यक ते जागा आरक्षण, पालखी मार्ग रुंदीकरण होणे श्रीक्षेत्र अक्कलकोटमध्ये होणे गरजेचे आहे. अन्य तीर्थक्षेत्रातील मंदिर परिसर पाहता त्या पध्दतीने अक्कलकोटमध्ये देखील होणे गरजेचे आहे. आजपर्यंत बघ्याची भूमिका घेणारे प्रशासन अचानक जागे होवून ऐनवेळी भक्तांचे व्यवस्थेकरिता धावपळ करावी लागली आहे. हे पाहूनच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वामी भक्तांच्या सेवेर्थ स्वत: मंदिर परिसरात जावून भक्तांची होत असलेल्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी केलेल्या उपाय योजना बाबत स्वामीभक्तांतून समाधान व्यक्त होत आहे.
आजवरच्या आमदारकीच्या कार्यकाळात मंदिरात येवून भक्तांच्या अडीअडचणी जाणून घेणून त्या तात्काळ सोडविण्याकामी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अग्रेसर ठरले आहेत. भविष्यात राज्यातील इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे सण, वार, उत्सव, स्वामींचा प्रकट दिन, पुण्यतिथी, श्री दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, दिवाळी व उन्हाळी सुट्टी या कालावधीत प्रचंड गर्दी होणारच आहे. या धरतीवर श्रीक्षेत्र अक्कलकोटचा विकास होणे काळाची गरज आहे. निवासाची व्यवस्था नसल्याने मंदिरापासून चार ते पाच किलो मिटर अंतरावरील गावागावापर्यंत मिळेल त्या ठिकाणी, वाड्या वस्त्यांवर भक्तांना रहावे लागले आहे. हे सर्व पाहता त्वरीत उपाय योजना हाती घेणे गरजेचे आहे.
तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत कोट्यावधीचा निधी, याबरोबरच राज्य शासनाकडून विशेष अनुदान, रस्ते अनुदान, यात्रा अनुदान, वैशिष्ट्यपुर्ण, राज्य नगरोत्थान, जिल्हा नगरोत्थान, नगरपरिषद निधी या विविध निधींचा वापर कोठे करण्यात आला. याची ‘कॅग’व्दारे चौकशी व्हावी यासह श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान ते अन्नछत्र मंडळ ‘स्कायवॉक’ करिता राज्य शासनाकडून नगरपरिषदेला ठराव करण्याकामी आदेश होवून सुध्दा तो बासनात गुंडाळण्यात आला. यामुळे सध्या जो भक्तांचा ताण पडत आहे. हा ताण नगरपरिषदेच्या गंभीर चुकांमुळे होत असल्याचा आरोप स्थानिक व स्वामी भक्तांतून होत आहे. प्रचंड गर्दीमुळे दुर्घटना घडली असली तर यास जबाबदार कोण? असा सवाल स्वामीभक्तांतून व्यक्त होत आहे.
पाहणी करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासमवेत देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, महेश हिंडोळे, अॅड.विजय हर्डीकर, माजी सरपंच प्रदिप पाटील, मुख्याधिकारी सचिन पाटील, पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, मल्लिनाथ स्वामी, विठ्ठल तेली आदीजण उपस्थित होते.