अक्कलकोट, वृत्तसंस्था
अक्कलकोट तालुक्याच्या आमदारपदी सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड झाल्याबद्दल दुधनीतील सर्व ग्रामस्थ अडत व भुसार व्यापारी असोसिएशनच्यावतीने आमदार कल्याणशेट्टी यांचा (गुरुवारी) सायंकाळी ५ वाजता दुधनी येथील गांधी चौकात नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सातलिंगप्पा उर्फ अप्पू परमशेट्टी व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज परमशेट्टी यांनी दिली.
दुधनी शहरासाठी व तालुक्यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांनी आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणला आहे. याच निधीमुळे आणि तालुक्यात झालेल्या विकासामुळे तालुक्यातील जनतेने सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताने आमदारपदी निवड केली आहे. याबद्दल दुधनीत त्यांच्या विशेष सत्काराचे नियोजन केले असल्याचे परमशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, ज्येष्ठ नगरसेवक महेश हिंडोळे, नितीन गुत्तेदार, विश्वनाथ रेऊरे, संजय देशमुख यांच्यासह दुधनीतील स्थानिक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मैंदर्गी नाका ते गांधी चौक या दरम्यान रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध समाजाच्यावतीने आमदार कल्याण शेट्टी यांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन दुधनी शहर भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.