नागपूर : वृत्तसंस्था
नागपूरमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या अधिवेशनात भाजप आमदाराकडून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तुकाराम मुंढे नागपुर महापालिकेचे आयुक्त होते, त्यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतल्याचा आरोप भाजपचा आहे. तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून काम करत आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे पेमेंट केले होते असाही आरोप करण्यात आला आहे. यात तुकाराम मुंढे यांनी काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याच्या आरोपांचाही समावेश आहे.
नियमबाह्य पद्धतीने कारभार आणि महिला अधिकाऱ्यांना दमदाटी प्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल केली होती. पण मविआचे सरकार असल्यानं दबावामुळे तुकाराम मुंढेंवर कारवाई झाली नव्हती. आता या दोन्ही प्रकरणात तुकाराम मुंढेंवर कारवाई करण्याची मागणी भाजप करणार आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढे आपल्या कठोर निर्णयामुळे ओळखले जातात. गेल्या 20 वर्षांत त्यांची 24 व्यांदा बदली झाली आहे. अलिकडेच ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलंय. त्यांचा सडेतोड स्वभाव हाच त्यांचा बदलीचं कारण ठरत असतो. ते राजकीय दबावाला कधीही जुमानत नाहीत, अशी देखील त्यांची एक ओळख आहे.