ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदारांनी आरक्षणाच्या बाजूने बोलावं ; जरांगे पाटलांचा इशारा

जालना : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यापासून आंदोलनाचा पवित्रा घेतला असून उद्या मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला जाणार आहे. उद्या मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळेल. याच पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.

“ओबीसी समाजला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळेल. मराठा आरक्षणाने ओबीस आरक्षणाला धक्का लागण्याचा प्रश्नच येत नाही. उद्या जो कायदा होणार आहे त्याचं कौतुक, आनंद होणारच आहे. मात्र सरकारला सगे सोयऱ्यांबाबत भूमिका मांडावीच लागेल, फक्त अधिसुचना काढून चालणार नाही, त्याची अंमलबजावणी करावी लागेल,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“उद्या अधिवेशनात मराठा आमदारांनी आरक्षणाच्या बाजूने बोलावं. सगे सोयऱ्यांच्याबाबत एकमताने आवाज उठवावा. मंत्री महोदयांनी आणि आमदारांनी राजकारण सोडून स्पष्ट आरक्षण मागावे. मराठ्यांनी काय आमची पोरं बरबाद करण्याचा आणि तुम्हाला मोठं करण्याचा ठेका घेतलाय का?नेते जर उद्या उभे राहिले नाहीत तर ते मराठा विरोधी आहेत हे निश्चित होईल,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.दरम्यान, “सगेसोयऱ्याबाबतची अंमलबजावणी केली नाही तर 21 तारखेला आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मग बोलणंसुद्धा बंद होऊ शकतं. आजचा, उद्याचा दिवस आहे. आम्ही 20 चीच वाट बघणार आहोत, 20 तारखेला लक्षात येईल अंमलबजावणी करणार आहेत की नाही,” असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!