मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि अजित पवार गटामध्ये मोठा वाद सुरु आहे तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. वर्षा निवास्थानी या दोघांमध्ये बैठक झाली आहे. विविध विषयांसंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरणमध्ये नुकतीच यशश्री शिंदे या तरुणीची हत्या झाली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. नवी मुंबईत अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण देखील फास्ट ट्रॅकवर चालवावे आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. याशिवाय पुण्यातील पूर, आरक्षण आणि जातीवाद या विषयावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई हे देखील उपस्थित आहेत. तसेच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर,अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारीही वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.
तसेच या बैठकीला राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव दीपक कपूर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर,तसेच गृह विभाग वित्त विभाग, एमएमआरडीए आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत.