ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात पैशांचा सूळसुळाट : नाशिकमधून 31 लाख तर पालघरमधून 4 कोटी 33 लाख जप्त

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र या आचारसंहितेत देखील राज्यात अनेक ठिकाणी पैशांचे घबाड आढळून येत आहेत. पुणे, मुंबईनंतर आता नाशिकमध्ये देखील पैशांची बॅग जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील नाकाबंदी दरम्यान 20 लाख 50 हजार तर उपनगर परिसरातील एका घरात 11 लाख रुपये सापडले आहेत.

नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भालेराव मळा परिसरातील झोपडपट्टीत पैसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. घर झडतीत सापडलेल्या पैशांतून 21 वर्षीय तरुणाला आणि नाकाबंदी दरम्यान कारमध्ये सापडलेल्या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांची किंमत एकूण 31 लाख इतकी आहे. पोलिसांना सापडलेल्या पैशांचा राजकीय व्यक्ती किंवा पक्षाशी संबंध आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मुंबई उपनगरातील दिंडोशी परिसरात 7 लाख 80 हजार 440 रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आचारसंहिता पथकाची दिंडोशी परिसरात नाकाबंदी सुरू असताना त्यांनी एक बाईक अडवली. यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वारांच्या बॅगेची तपासणी केली. यावेळी बॅगेत पैसे आढळून आले. पालघरच्या उधवा येथे तलासरी पोलिसांनी तब्बल 4 कोटी 33 लाखांची रोकड जप्त केली आहे. विशेष म्हणजे ही रोकड दादरा नगर हवेलीतून महाराष्ट्रात येत असताना ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. निवडणुकांमध्ये सर्रासपणे पैशाचा वापर होत असून याची कसून तपासणी आता निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोल यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!