कुरनूर धरणाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याच्या हालचाली; जिल्हाधिकार्यांनी केली धरण परिसराची पाहणी
अक्कलकोट : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या मागणीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज कुरनूर धरणाची पाहणी केली. या भेटी दरम्यान कुरनूर धरणाचा पर्यटन क्षेत्रात समावेश करावा या दृष्टीने विचार करून संबंधित अधिकार्यांशी चर्चा केली आणि अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे कुरनूर धरणाचा समावेश पर्यटन केंद्र म्हणून तसेच पक्षीनिरीक्षण केंद्र होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर बोरी मध्यम प्रकल्प जिल्हा नियोजन मंडळामध्ये “पर्यटन स्थळ” म्हणून घोषित करून निधीची तरतूद करावी, अशी मागणी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज कुरनुर धरणास भेट देऊन पाहणी केली.अक्कलकोट ते नळदुर्ग मार्गावरून कुरनूर धरण अतिशय जवळ आहे.या ठिकाणी अनेक दुर्मिळ पक्षी सापडले आहेत. हा परिसर पक्षीनिरीक्षणासाठी चांगला केंद्रबिंदू आहे. धरण परिसरात मोकळी जागा देखील मोठ्या प्रमाणातआहे त्यामुळे हा परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावा, अशी या परिसरातील नागरिकांची इच्छा आहे, असे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
डीपीडीसीतून यासाठी निधी मिळावा, अशी देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देखील सकारात्मक चर्चा करून याबाबत निश्चित विकास आराखडा करता येईल, असे स्पष्ट केले. यावेळी सरपंच व्यंकट मोरे यांनी गावातील दत्त नगर मधील रहिवाशांना प्लॉट देण्याची मागणी करत निवेदन सादर केले. या बैठकीला उजनी लाभक्षेत्राचे अधीक्षक अभियंता धीरज साळे ,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कोंडेकर,डॉ.व्यंकटेश मेतन ,तहसीलदार बाळासाहेब शिरसाट पंचायत समितीचे सभापती आनंद सोनकांबळे, गटविकास अधिकारी ऐवाळे, पत्रकार अभय दिवाणजी, वनविभागाचे अधिकारी धैर्यशील पाटील, वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन असोसिएशनचे शिवानंद हिरेमठ, पक्षी मित्र सचिन पाटील मंडळ अधिकारी सिद्धाराम जमादार, तलाठी जी.एस.घाटे, ग्रामसेविका बिराजदार, राहुल काळे आदी उपस्थित होते.
पाहणीनंतर जिल्हाधिकारी यांनी कुरनूर येथील जिल्हा परिषद शाळा, शेतकऱ्यांच्या बांधावर जात ई-पीक पाहणी नोंदीची माहिती घेतली. तसेच चपळगावातील आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण काम व चपळगाव प्रशालेतील कामकाजाची पाहणी केली.
पक्षी निरीक्षकांच्या आशा पल्लवित
संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कुरनूर धरणक्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास २०५ दुर्मिळ आणि परदेशी पक्ष्यांची नोंद झाली आहे.धरण परिसर हा भौगोलिकदृष्ट्या सुजलाम-सुफलाम आहे. याठिकाणी पर्यटनक्षेत्र विकसित व्हावे ही स्थानिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या दौर्याने परिसराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.