ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एमपीएससीचा निकाल जाहीर : सोलापुरातील विजय राज्यात प्रथम !

मुंबई : वृत्तसंस्था 

सोलापूर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आज मिळाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. त्यात सोलापूरच्या विजय नागनाथ लमकणे याने राज्यात पहिला, तर हिमालय घोरपडे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. नागपूरच्या प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

एमपीएससीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 27 मे 29 मे 2024 या कालावधीत घेतली होती. या परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या 1,516 उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया 30 ऑक्टोबरपर्यंत पार पडली. त्यानंतर आयोगाने गुरूवारी रात्री उशिरा निकाल जाहीर केला. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, सर्वसाधारण गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) तसेच पात्रता गुण जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. लमकणे यांची यापूर्वीही एमपीएससीच्या माध्यमातून विविध सेवांसाठी निवड झाली आहे. सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सातत्यपूर्ण मेहनत व आत्मविश्वासामुळे त्यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवत एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

हिमालय घोरपडे यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला. नागपूरच्या प्रगती जगताप ही विद्यार्थिनी एससी प्रवर्गातून राज्यात पहिली आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्य परीक्षेसाठी एकूण 7970 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 7732 उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केले होते. विविध तांत्रिक कारणांमुळे काही उमेदवारांना अर्ज सादर करण्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे एमपीएससीने अर्जप्रणाली खुली ठेवत उर्वरित पात्र उमेदवारांना संधीची कवाडे खुली ठेवली होती.

एमपीएससीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे की, हा निकाल आरक्षण, समांतर आरक्षण व अन्य न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी हवी असल्यास, गुणपत्रक मिळाल्याच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत ऑनलाईन अर्ज करता येईल.

यंदा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा कट-ऑफ सर्वाधिक राहिला. त्यामुळे त्याची विद्यार्थ्यांमध्ये खमंग चर्चा रंगली आहे. या परीक्षेत सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गासाठी कटऑफ 507.50 गुणांवर, अनुसूचित जातीसाठी (एससी) 447 गुण, अनुसूचित जमातीसाठी (एसटी) 415 गुणांवर गेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या उच्च कट-ऑफमुळे आश्चर्य व्यक्त केले आहे. या परीक्षेसाठी स्पर्धा अधिक तीव्र झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!