मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बदलापूर येथील शाळेत 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर मोठा जनउद्रेक उसळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सरकारने हे प्रकरण जलदगती न्यायालयात न्यावे. विशेषतः अशा नराधमांच्या मनात धडकी भरण्यासाठी त्यांना एकदा तरी सार्वजनिकपणे फाशी दिली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, लैंगिक अत्याचाराची एखादी अशी घटना घडल्यानंतर केवळ बदल्या करून प्रकरण सुटणार नाही. गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना त्याचे उत्तर द्यावे लागेल. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा मी निषेध करते. अशा गोष्टी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज असते. त्यामुळे माध्यमांसह सर्वांनीच पीडित मुलीची ओळख जाहीर करू नये.
सरकारनेही हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेले पाहिजे. या प्रकरणातील व्यक्तीला फाशीची शिक्षा होईल याची काळजी घेतली पाहिजे. बलात्कार करणाऱ्याला फाशी झाली तरच असे कृत्य करणाऱ्याच्या मनात भीती निर्माण होईल. कारण, सद्यस्थितीत खाकी वर्दीची भीतीच उरली नाही. पोर्शे कार अपघात प्रकरणात काय घडले हे त्यावरून हे लक्षात येते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आजचा हा जनक्षोभ पोलिसांविरोधात आहे. अत्याचार झालेल्या मुलींचे पालक तक्रार दाखल करण्यासाठी 12 तास वणवण भटकत होते. पण एकाही पोलिस ठाण्याने त्याची दखल घेतली नाही. छत्रपतींच्या महाराष्ट्रात हा न्याय आहे का? फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हा न्याय आहे का? या सरकारला आपल्या लेकींना न्याय देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.