मुंबई कॉंग्रेसमधील वाद पुन्हा एकादा चव्हाट्यावर, मुंबई काँग्रेस युवक अध्यक्षांनी लिहिलं सोनिया गांधी यांना पत्र
मुंबई : मुंबई कॉंग्रेसमधील वाद पुन्हा एकादा चव्हाट्यावर आली आहे. मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. मुंबई काँग्रेस युवक अध्यक्ष तथा आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याबद्दल तक्रार केली आहे. राजगृहात जाण्यावरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार झिशान सिद्दीकी, युवा नेते सूरज सिंह ठाकूर यांच्यात वाद झाला.
आमदार झिशान यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिले आहे की, मुंबईत १४ नोव्हेंबर रोजी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान भाई जगतापांनी माझ्यासोबत गैरवर्तणूक केली. त्यांनी माझ्या धर्माविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यांनी मला धक्काबुक्की देखील केली आणि गर्दीसमोर माझा अपमान केला. मात्र आपल्या पक्षाची प्रतिमा अबाधित राहावी यासाठी मी तेव्हा काही बोललो नाही. मात्र भाई जगताप यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जावी, अशी माझी मागणी आहे. नवभारत टाइम्सकडून हे वृत्त देण्यात आले आहे. झिशान सिद्धिकी यांनी या आधी देखील भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार केली होती. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून भाई जगताप यांनी आपल्या विरोधात कारवाई केल्याचे झिशान यांनी म्हटले होते.