मुंबई वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दंड ठोठावला आहे. अतिशय संवेदनशील मुद्द्यावरून शासनाचे कान टोचत न्यायालयाने ही दंडात्मक कारवाई केली आहे. पोलिसांच्या गैरवर्तनासंदर्भातील तक्रारी करूनही या तक्रारींकडे गांभीर्यानं न पाहिल्याप्रकरणी न्यायालयानं राज्य शासनाला हा दंड ठोठावला आहे. न्यायालयानं 1 लाख रुपयांचा दंड सुनावला असून, पोलिसांच्या गैरवर्तनासंदर्भात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
प्रकरण काय आहे ?
2012 मधील एका महिलेच्या पतीला पोलिसांनी बेकायदेशीररित्या अटक केल्याप्रकरणी न्यायालयानं ही सुनावणी केली. रत्ना वन्नम यांचे पती, चंद्रकांत वन्नम यांच्यावर बेकायदेशीर बांधकामप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली होती. शेजाऱ्यांनी 20 हजार रुपयांची मागणी केली असता वन्नम यांनी ही मागणी नाकारली. ज्यानंतर त्यांची तक्रार करण्यात आली. पण, शेजारी आपला छळ करत असल्याचा आरोप त्यांनी पोलिसांकडे करत तिथं तक्रार दाखल करण्यासाठी आवाज उठवला तरी पोलिसांनी हद्दीचा मुद्दा उपस्थित करत तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला.
उलटपक्षी पोलिसांनी चंद्रकांत वन्नम आणि बांधकामाच्या ठिकाणावरून इतर पाच जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलीस निरीक्षकांकडून वन्नम यांच्या सुटकेसाठी 12 हजार रुपयांची रक्कम मागण्यात आली, तर प्रत्येक कामगाराच्या सुटकेसाठी 1200 रुपयांची मागणी झाली. हा दंड भरूनही चंद्रकांत यांना जामीन मिळेपर्यंत पोलिसांकडून सोडण्यात आले नव्हते.
यानंतर कोर्टाने निकाल देताना सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक तुकाराम जाधव यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. पोलिसांच्या अधिकारांचा आणि कायद्याचा गैरवापर ही बाब इथं अधोरेखित करण्यात आली. याचिकाकर्त्यांना झालेला मनस्ताप, जाधवांवर कारवाईचे निर्देश असतानाची त्याची अंमलबजावणी न होणं ही बाब अधोरेखित करत न्यायालयानं वन्नम यांच्या पत्नीला शासनानं 1 लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम द्यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.