मुंबई वृत्तसंस्था : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे बंधूंच्या बहुचर्चित मुलाखतीचा पहिला भाग अखेर प्रदर्शित झाला असून, या मुलाखतीत मुंबईच्या विकासावर आणि सध्याच्या दुरवस्थेवर जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र बसवून विविध विषयांवर स्पष्ट भूमिका मांडायला लावली. मुंबई, राजकारण, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच सामान्य मुंबईकरांच्या समस्या यावर या संवादात परखड मतं व्यक्त झाली.
मुंबईच्या सध्याच्या अवस्थेबाबत बोलताना महेश मांजरेकर यांनी अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “आज मुंबईत बाहेर पडताना लाज वाटते. एखाद्या फुग्यात त्याच्या क्षमतेपेक्षा पाचपट हवा भरली, तर जसं होतं, तशीच अवस्था मुंबईची झाली आहे,” असे सांगत त्यांनी अनियंत्रित विकासावर ताशेरे ओढले. वाढत्या बांधकामांमुळे, प्रदूषणामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे मुंबई राहण्यायोग्य राहिलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. इतकंच नाही तर, “आता असा विकास नको,” अशी उद्विग्न भावना देखील त्यांनी व्यक्त केली.
मुंबई कधी डिकन्जेस्ट होणार, या थेट प्रश्नावर उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या विकास धोरणांवर जोरदार टीका केली. “आज मुंबईत जेवढं प्रदूषण आहे, हवा गुणवत्ता निर्देशांक इतका खराब आहे, तो कधी होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “भाजपने लावलेली विकासाची होर्डिंग्ज ही विकासाची गती नाही, तर विनाशाची गती आहे,” असे म्हणत त्यांनी नियोजनशून्य विकासावर बोट ठेवलं.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आपल्याला नेमकं काय हवं आहे, हेच या सरकारला कळलेलं नाही. सर्वत्र रस्ते खोदलेले आहेत, मेट्रो, पूल, उंच इमारती एकाच वेळी उभ्या राहत आहेत. विकास हवा आहे, पण तो नियोजनबद्ध हवा. सगळं एकाच वेळी सुरू केल्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.” मुंबईकर भरत असलेल्या करांच्या बदल्यात प्रदूषण, कोंडी आणि अस्वस्थता मिळते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईच्या प्रश्नांवर बोलल्यामुळे ही मुलाखत केवळ राजकीय नव्हे, तर मुंबईच्या भवितव्याबाबतची गंभीर चर्चा ठरत असल्याचं दिसत आहे. मुलाखतीच्या पुढील भागात आणखी कोणते राजकीय आणि सामाजिक मुद्दे समोर येणार, याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.