दुधनी दि.२०: अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे एका शेतकऱ्याचा भरदिवसा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला.शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात मयताची पत्नी लक्ष्मी रमेश निंबाळ यांनी फिर्याद दिली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
दक्षिण पोलीस ठाणे कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि.१९ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी लक्ष्मी व त्यांचे पती रमेश शरणप्पा निंबाळ स्वतःच्या मोटरसायकलीवरून त्यांच्या शेतातील लक्ष्मी मंदिरात पाया पडून परत घराकडे येत असताना दुधनी गावातील रुपाभवानी मंदिर जवळ रमेश निंबाळचे ओळखीचे इसम व नेहमी त्यांच्या घरी ये – जा करणारा सैदप्पा चंद्रशा व्हसूर हा रमेश निंबाळची गाडी थांबवून आपण केळी, द्राक्षे आणायला जाऊ असे म्हणाला, त्यावेळी रमेश निंबाळ यांनी नकार देत पती-पत्नी दोघेही घरी आले. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे सैदप्पा व्हसूर हा सुद्धा निंबाळच्या घरी आला आणि रमेश निंबाळला परत विनवाणी करत लवकर परत येऊ म्हणत, रमेश निंबाळलला मोटार सायकलवर बसवून केळी, द्राक्षे आणायला घेऊन गेला.
त्यानंतर रमेश निंबाळची पत्नी लक्ष्मी दुपारी साडेबाराच्या सुमारास रमेश निंबाळला फोन करुन मुलाला दवाखान्यात पाठविण्यसाठी विचारणा केली असता रमेश निंबाळ यांचा फोन बंद होता.काही वेळेनंतर लक्ष्मीपुत्र शरणप्पा निंबाळ, सुरेश शरणप्पा निंबाळ व गावातील नागरिकांनी सांगितले की, रमेश निंबाळ याचा कोणीतरी दुधनी ते बडदाळ रस्त्यावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याचे सांगितले. तेव्हा मयत रमेश यांची पत्नी लक्ष्मी यांनी सैदप्पा व्हसूर यांनीच माझे पती रमेश निंबाळला मारल्याचे दक्षिण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.रमेश निंबाळ यांना मारण्याची नेमके कारण काय ? व यात कोण कोण असतील हा विषय अजून तरी गुलदस्त्यात आहे.
मयताच्या पश्चात पत्नी लक्ष्मी, प्रमोद व प्रसन्ना असे दोन मुले आहेत. सैदप्पा व्हसूर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कोर्टासमोर हजर केले असता सैदप्पा व्हसूर याला २४ मार्च पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.शनिवारी मात्र घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, डीवायएसपी डॉ. संतोष गायकवाड, पीएसआय छब्बू बेरड, पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय जाधव व पोलिस हवालदार अजय भोसले आदींनी भेट देऊन माहिती घेतली.पुढील तपास पीएसआय छब्बू बेरड हे करत आहेत.