नागनहळळी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणली स्मार्ट हॉस्पिटलची संकल्पना ! संशोधनातून तयार झालेल्या उपकरणाची डॉक्टरांना होणार मदत
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.१९ : आश्रम शाळा म्हटले
की विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यातल्या त्यात पुन्हा दुर्गम भागातील आश्रम शाळा म्हटले की आणखी वेगळा.पण अक्कलकोट तालुक्यातील नागनहळळी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी काही वेगळेच करून दाखविले आहे.ते म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात माणूस वाचविण्यासाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित होत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्मार्ट हॉस्पिटलची संकल्पना पुढे आणली आहे.अतिशय सूक्ष्म संशोधनातून तयार झालेल्या या उपकरणाची निवड आता राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी झाल्याने या विषयाची चर्चा आता वैद्यकीय क्षेत्रातून देखील सुरू झाली आहे.
के.बी.एन.माध्यमिक आश्रमशाळा व के.एस.एम.कनिष्ठ महाविदयालय नागनळळीचे हे विद्यार्थी आहेत.बारावी विज्ञान शाखेत शिकणा-या सुनिल बिराजदार,दर्शन तेलिकोने व आनंद नरुणे या विद्यार्थ्यांनी हे उपकरण तयार केले आहे.आजच्या या विज्ञानाच्या या युगामध्ये सर्वच क्षेत्रात रोज नव नवीन बदल घडत आहेत असे असताना रुग्ण सेवेसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्य असे
मोठे हाॅस्पिटल मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत.अपुऱ्या जागेमुळे हे हाॅस्पिटल आता अनेक मजल्यावरती होत आहेत.याप्रसंगी रुग्णावर उपचार करताना हाॅस्पिटलमध्ये काम करणा-या डाॅक्टर्स, नर्स, वाॅर्ड बाॅय व इतर
सर्व कर्मचा-यांना ताण येत आहे.अशा वेळी रुग्णाची अदयावत माहिती तात्काळ व गरजेनुसार संबंधित व्यक्तीच्या भ्रमणध्वनीवर उपलब्ध व्हावी.यासाठी या स्मार्ट
उपकरणाचा मोठया प्रमाणात उपयोग होईल.बऱ्याच वेळा हाॅस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णास सलाईनव्दारे अनेक उपचार केले जातात.ते उपचार करत असताना सलाईन बंद करण्यास स्टाफ मार्फत विलंब झाल्यास त्या सलाईनव्दारे एअर जावून रक्तामध्ये गाठी होण्याची शक्यता असते.कालातंराने त्याचा धोका हृदयावर सुध्दा होवू शकतो.सदर उपकरणामध्ये ते सलाईन संपण्यापूर्वी डाॅक्टर स्टाफ रुमध्ये बझर वाजेल.जेणेकरुन त्यामुळे मजला,रुम नंबर, बेड नंबर, असे अचूक माहिती डाॅक्टर स्टाफरुमध्ये टीव्ही सिक्रनवर दिसेल.त्यामुळे त्या रुग्णास योग्य उपचार त्याठिकाणी तात्काळ करता येते.
एखादया प्रसंगी एकाच रुग्णावर एकापेक्षा जास्त डाॅक्टर्स उपचार करत असतात.अशा प्रसंगी इर्मजन्सीमध्ये एखादे डाॅक्टर्स अनुपस्थित राहिल्यास संबंधित रुग्णावर करावयाच्या पुढील उपचारबाबतची स्क्रिप्ट नोटव्दारे स्क्रिनवर दाखविली जाईल.तो उपचार दुस-या डाॅक्टर्सकडून किंवा नर्सकडून उपचाराबाबत सातत्य ठेवून रुग्णाचा जीव वाचविता येईल.या उपकरणाच्या वापरातून हाॅस्पिटल आणखी अदयावत होण्यास मोठी मदत होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणात आहे ती विकसित करता आली पाहिजे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,असे संस्थेचे सचिव जावेद पटेल यांनी सांगितले.या विद्यार्थ्यांना सह शिक्षक एस.एस.बशेट्टी,प्रा.आर.जी.नवले,प्रा.ए.एस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
कमी खर्चिक आणि
आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त
सोलापुर शहर मागच्या काही वर्षांपासून मेडिकलच्या बाबतीत झपाट्याने पुढे जात आहे.आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केल्याने याची डॉक्टरांना खूप मोठी मदत होणार आहे आणि विशेष म्हणजे हे उपकरण आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून कमी खर्चीक व आपत्तकालीन उपयोगी आहे.