नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याची उपराजधानी नागपुरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावात वाढ वेगाने होत आहे. प्रत्येक दिवशी एक हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण पुढे येत असल्यामुळे शासन आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस नागपुरात ‘वीकएन्ड कर्फ्यू’चे आयोजन करण्यात आलंय. यामध्ये लोकांनी आणि व्यावसायिकांनी स्वयंशिस्तीने घरात राहून कोरोना विरुद्धच्या लढाईच्या दुसऱ्या टप्प्यात आपले योगदान देणे अपेक्षित आहे. अगदी सकाळी-सकाळी उघडणारी दुकाने देखील बंद असुन सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रात नागपूर बंदला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध कडक असले तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते हितकारक असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी आणि पालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळून कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन केले आहे.