सोलापूर – कोरोना जागतिक महामारीचा फटका सबंध उद्योग विश्वाला बसला आहे. याचाच परिणाम सोलापुरातील टेक्सटाईल व गारमेंट उद्योगाला झाला असल्याने सोलापुरातील उद्योजक कामगार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापुरात नावारूपास येणाऱ्या टेक्सटाइल व गारमेंट उद्योगाला कोरोना महामारीतून बाहेर काढत वस्त्रोद्योगास पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली.
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योग, गारमेंट उद्योजकांसह भेट दिली. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूरच्या उद्योगाची संपूर्ण माहिती करून दिली. सोलापुरातील गारमेंट उद्योगात असलेली ताकद व जगभरात मिळत असलेला नावलौकिक पाहता कोरोना महामारीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे टेक्सटाइल, गारमेंट उद्योगाशी निगडित सर्व समस्या येत्या कार्यकाळात सोडविण्याची साद केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना घातली.
केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी याप्रसंगी, सोलापूरच्या उद्योगास पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी वाट्टेल ती मदत करणार. उद्योजक, कामगारांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले. तसेच कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारून उद्योजकांना मोठे मार्केटिंग प्लॅटफॉर्म देण्याचे सांगितले. विशेषतः एमएसएमई कडून खादी उद्योगाशी सोलापुरातील सर्व उद्योग जोडून सर्वांना आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. यामुळे वस्त्रोद्योग तसेच इतर उद्योगांना मोठी ताकद मिळण्याचा आत्मविश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी याप्रसंगी दिला.
यावेळी उद्योजक रवींद्र मिणियार, अमित जैन, रमेश डाकलिया, सतीश पवार यांच्यासह सोलापूर गारमेंट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.