राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांचा पुढाकार, उभारले ११०० बेड्सचे अद्ययावत कोविड सेंटर
पारनेर : राज्यात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने तसेच निलेश लंके प्रतिष्ठान आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शरदचंद्र आरोग्य मंदिर (कोविड सेंटर) येथे १,१०० बेड्चे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
यापैकी १०० बेड्सना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली आहे. या कोविड सेंटरसाठी निलेश लंके यांनी तालुक्यातील नागरिकांना अन्नदान व विविध सुविधांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.आतापर्यंत तालुक्यातून १७ लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले आहेत.
तालुक्यातील मुंगशी गावातील ग्रामस्थांकडून ५ टन धान्य व ५० हजार रुपये अशी मदत उपचार केंद्रात जमा करण्यात आली आहे. याशिवाय भाजीपाला, फळे, अंडी, किराणा, वाफ घेण्याची यंत्रे, कोमट पाण्यासाठी थर्मास अशा विविध वस्तूंची मदतही मोठ्या प्रमाणात होत आहे.