अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट येथील शिवपुरी संस्थानकडून अग्निहोत्राचा प्रचार व प्रसार मोठ्या जोमाने सुरू असून अग्निहोत्र हे मानवी जीवनाच्या सुख व शांततेसाठी आजच्या काळात आवश्यक बाब बनले आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. बुधवारी, अक्कलकोट दौऱ्या प्रसंगी त्यांनी शिवपुरी संस्थानला भेट देऊन अग्निहोत्र केंद्र व त्याविषयीची माहिती जाणून घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी संस्थेच्यावतीने अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या चैतन्य पादुकांचे दर्शन घेऊन व्याहृति होम केला.
यावेळी बोलताना डॉ. राजीमवाले यांनी जर्मनी व अन्य देशातील अग्निहोत्र केंद्राबाबत माहिती दिली. अग्निहोत्राचे फायदे, शिवपुरी संस्थानकडून याबाबत केले जाणारे प्रयत्न तसेच शिवपुरी येथील विविध शक्ती स्थळांची माहिती त्यांना दिली. याबाबत मुख्यमंत्री सावंत संस्थेच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करून शिवपुरी विश्व फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थानच्यावतीने डॉ.राजीमवाले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या समवेत आमदार सचिन कल्याणशेट्टी, अण्णा वाले, राजकुमार झिंगाडे, डॉ. गणेश थिटे, धंनजय वाळुंजकर, वक्रतुंड औरंगाबादकर, योगेश जोशी आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.