नवी दिल्ली वृत्तसंस्था
1 जानेवारी 2025 पासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामध्ये एलपीजीच्या किमतीपासून ते ईपीएफओपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे.
पीएफ खातेधारकांना वर्ष 2025 च्या सुरुवातीला एक विशेष भेट मिळू शकते, ज्याद्वारे एटीएम मशीनमधून पीएफचे पैसे काढणे शक्य होईल. यासाठी कामगार मंत्रालय काम करत आहे. अलीकडेच, कामगार सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, श्रम आणि रोजगार मंत्रालय पीएफ काढणे सुलभ करण्यासाठी आणि सेवा सुधारण्यासाठी आपली IT प्रणाली अपग्रेड करत आहे.
दर महिन्याच्या 1 तारखेला सरकार एलपीजीच्या किमतीत बदल होतात. काही काळापासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. देशात 14 किलोच्या किचन सिलेंडरची किंमत बऱ्याच दिवसांपासून स्थिर आहे. अशा परिस्थितीत यावेळीही एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल अपेक्षित आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच फीचर फोन वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. आता UPI 123Pay वापरून 10,000 रुपयांपर्यंतचे UPI पेमेंट केले जाऊ शकते. ही सुविधा 1 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. पूर्वी ही मर्यादा 5 हजार रुपये होती.
नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्जाची मर्यादा 2 लाख रुपये केली आहे. नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. यापूर्वी ही मर्यादा 1.60 लाख रुपये होती.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने आपल्या कराराच्या समाप्तीच्या दिवसात बदल जाहीर केले आहेत. हे 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल. एनएसईने २९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते. आता FinNifty, MidCPNifty आणि NiftyNext50 चे मासिक करार संबंधित महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतील. बँकनिफ्टीचे मासिक आणि त्रैमासिक करार एक्स्पायरी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतील.