ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवार विमान दुर्घटनेवर नवा ट्विस्ट; भाजपचा आरोप : “रोहित पवारांच्या कारखान्याच्या धुरामुळे अपघात?”

पुणे : वृत्तसंस्था 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले असतानाच आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव  सोलनकर यांनी या दुर्घटनेचा संबंध रोहित पवार यांच्या साखर कारखान्याशी जोडत खळबळजनक दावा केला आहे.

या संदर्भात सोलनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र   फडणवीस यांना पत्र लिहून सखोल तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. रोहित पवार यांच्या साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरातील दृश्यमानता कमी झाली होती का आणि त्यामुळेच विमान दुर्घटना घडली का, याची वैज्ञानिक तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

सोलनकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील शेठफळ गडे येथे रोहित पवार यांचा साखर कारखाना आहे. या कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील वातावरणावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत. धुरामुळे काही वेळा परिसरात धुक्यासारखी परिस्थिती निर्माण होते का, याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या मते, कारखान्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच त्वचेच्या तक्रारी उद्भवत असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत. याशिवाय या औद्योगिक उत्सर्जनाचा शेतीवरही परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला त्या दिवशी बारामती परिसरात साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाली होती का, असा सवाल सोलनकर यांनी उपस्थित केला आहे. औद्योगिक उत्सर्जनामुळे कृत्रिम धुके तयार झाले होते का आणि त्याचा विमानाच्या उड्डाणावर किंवा लँडिंगवर परिणाम झाला का, याची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल वैज्ञानिक व तांत्रिक चौकशी करण्याची मागणी सोलनकर यांनी केली आहे. विशेषतः रोहित पवार यांनी त्यांच्या साखर कारखान्यातून होणारे उत्सर्जन विमानतळाच्या कार्यावर किंवा उड्डाण मार्गावर परिणाम करते का, याबाबत तांत्रिक सादरीकरण करावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवरून आधीच राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना आता या नव्या आरोपामुळे या प्रकरणावर राजकीय वाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!