बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतांना आता ‘खोक्या’ पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन व्यक्तींना मारहाण करणे तसेच हरणांच्या शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी जेल बाहेर आणल्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यावेळी त्याच्या जेवणासाठी बिर्याणीचा बेत आखल्याची माहिती देखील समोर आली आहे. सतीश भोसले याच्यासोबत त्याचे नातेवाईक आणि मित्र देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ सोमवारी दुपारी चित्रित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओवरून वादंग उठल्यानंतर आता बीड पोलिस अधीक्षकांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
सतीश भोसलेला बीड पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याची माहिती आता समोर आली आहे. बीड पोलिसांकडून खोक्याची शाही बडदास्त राखली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खोक्या भाई जेलच्या बाहेर मोबाइलवर बोलताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोमवारी दुपारी चित्रित करण्यात आला. आता या व्हिडिओमुळे बीड पोलिसांबद्दल पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सतीश भोसले हा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. मात्र कारागृहात असताना देखील तो कारागृहाच्या आवारात अनेक कार्यकर्त्यांना मुक्तपणे भेटत असून त्याच्यासाठी खास जेवणाचे डबे कारागृह परिसरात आणले जात असल्याचे या व्हिडिओवरून आता समोर आले आहे . न्यायालयीन कोठडीत असताना पोलिस या आरोपीची शाही बडदास्त कशासाठी राखतात? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. यावर आता पोलिस अधीक्षकांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.