ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पर्यावरण संवर्धनासाठी नवदाम्पत्याचा पुढाकार ; साखरपुडा कार्यक्रमात पाहुण्यांना साखरेसोबत “सिडबॉल” भेट

मुरूम : वाढत्या शहरीकरणाच्या माध्यमातून शहरा बरोबरच ग्रामीण भागातही सिमेंटचे जंगल उभे राहत आहे. लोकसंख्या वाढल्याने रस्ते आणखी मोठे करण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या झाडांवर कुर्हाड चालवली जात आहे. परिणामी शेतीपूरक जमिनीबरोबरच झाडांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने निसर्गचक्र बिघडत चालले आहे. याचा परिणाम म्हणून मानवजातीला अनेक संकटांचा सामना करावा लागत असून लहान मोठ्या पक्षांच्या प्रजातीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणा बरोबरच झाडांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासन स्तरावरून मोहीम राबवली जाते. निसर्गप्रेमी बरोबरच विविध संघटना सुद्धा वृक्ष लागवड व संवर्धनासाठी पुढाकार घेत असतात. निसर्गाचे आपणही कांही देने लागतो या जाणिवेतून उमरगा येथे पार पडलेल्या एका साखर पुडा कार्यक्रमात वधू-वरांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आप्तेष्टांना गोड साखरेबरोबर भेट स्वरूपात पर्यावरण पूरक असलेल्या विविध प्रकारच्या झाडांचे बिया (सिडबॉल) देऊन वृक्षारोपणाबाबत अनोख्या पध्दतीने जनजागृती करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

उमरगा येथील डॉ सुभाष येळापुरे यांचे चि डॉ निलेश आणि सोलापूर येथील स्व काशिनाथ भरमशेट्टी यांची कन्या डॉ नेहा या दोघांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला.वैद्यकीय शिक्षण घेत असताना दोघांनीही कोरोना काळात रुग्णांना सेवा दिली आहे. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. रुग्णांवर उपचारादरम्यान डॉक्टर मंडळींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.सर्वत्र प्राणवायूच्या कमतरतेची अडचण निर्माण झाली होती. कोरोना महामारीत उपचाराबरोबरच “व्हेंटिलेटर”च्या माध्यमातून प्राणवायू मिळवण्यासाठी दवाखान्यासमोर रांगा लागल्या होत्या. प्राणवायूच्या कमतरतेमुळे या काळात अनेकांना जीव गमवावा लागला. घरातील कर्ता गेल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली.

प्राणवायू निर्मित करता येत असले तरी हवेतील ऑक्सिजन (प्राणवायू) आणि कार्बनडायॉक्साईडचे समतोल राखण्याचे काम झाडांच्या माध्यमातून होत असते. वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत असल्याने हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे. वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. औद्योगिकरणातून शहरालगत मोठमोठे कारखाने उभे राहत असल्याने प्रदूषण वाढले आहे.ऋतुमानावर सुध्दा याचा परिणाम दिसून येत आहे.हवा दूषित झाल्याने लहान बालके आणि वृद्ध मंडळी “व्हायरल इन्फेक्शन” मुळे लहानसहान आजाराला लवकर बळी पडत आहेत.

प्रदूषण नियंत्रणासाठी हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून सामाजिक कार्यक्रमा बरोबर आता घरगुती कार्यक्रमातुन सुद्धा याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. येळापुरे आणि भरमशेट्टी परिवाराने साखरपुडा कार्यक्रमात उपस्थित आप्तेष्टांना “सिडबॉल” भेट देऊन वृक्षारोपणाबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती केली आहे.

 

“जनसेवा हीच इश सेवा” हा बोध घेत रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार – डॉ नेहा भरमशेट्टी

माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले आहे. मला पूर्वीपासून सामाजिक कार्याची आवड आहे. अक्कलकोट तालुक्यात के बी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. “जनसेवा हीच इश सेवा” हा बोध घेत रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वृक्षारोपणाची गरज ओळखून साखरपुडा कार्यक्रमात “सिडबॉल” भेट दिले आहे. घराजवळ मोकळ्या जागेत किंवा शेतात बांधावर या सिडबॉल लावायच्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!