मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी चौकशी सुरू असताना या घटनेला नवे राजकीय वळण मिळाले आहे. कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यासाठी त्यांनी युगेंद्र पवार व कार्यकर्त्यांसह बारामती पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या घडामोडीनंतर रोहित पवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन दुर्घटनेबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध कागदपत्रे सादर केली. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना त्यांनी हा विषय पुन्हा जोरकसपणे उपस्थित केला.
“महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंका दूर व्हाव्यात, चौकशी पूर्णपणे पारदर्शक व्हावी आणि कोणतीही बाब दडपली जाऊ नये,” अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली. केंद्र सरकारकडून सविस्तर चौकशी अहवाल अपेक्षित असून तो उद्यापर्यंत प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “उडताउडतीचा अहवाल चालणार नाही; तपशीलवार अहवालच हवा,” असा इशाराही त्यांनी दिला. पुढील घडामोडींविषयी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती येथे गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करताना गर्दीची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यातही तक्रार करण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथेही गुन्हा दाखल झाला नाही. संबंधित प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावे, अशी मागणी त्यांनी केली असून तांत्रिक अडचणींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांचे मुंबईतील देवगिरी बंगल्यावर स्मारक उभारावे, विधानभवन परिसरात स्मारक व्हावे, बारामती विमानतळ अत्याधुनिक करून त्याला त्यांचे नाव द्यावे तसेच पुणे रिंग मार्गालाही त्यांचे नाव द्यावे, अशा मागण्याही रोहित पवार यांनी केल्या. या दुर्घटनेत सुरक्षा रक्षक सुदीप जाधव यांचाही मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नीला कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
राज ठाकरे यांच्या भेटीत सर्व कागदपत्रांवर चर्चा झाली असून “अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने पाठिंबा देऊ,” असे आश्वासन मिळाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, चौकशी अहवालानंतर पुढील घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.