बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील खुनाची चर्चा राज्यभर सुरु असतांना नुकतेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सर्व गावकऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. सुमारे दोन तास हे आंदोलन चालले. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे पोलिस अधीक्षक नवीन कॉवत यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिकांसह मुलेही सहभागी झाले होते. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे फोटो हातात घेऊन महिला देखील पाण्यात उतरल्या. या आंदोलनावेळी काही महिला आंदोलकांची प्रकृती बिघडली. त्यांना तलावातून बाहेर काढण्यात आले.
आंदोलनस्थळी बीडचे पोलिस अधीक्षक नवीन कॉवत हे दाखल झाले. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत असताना ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली. सामान्य लोकांना ज्या गोष्टी माहीत आहेत, त्या पोलिसांना का माहीत नाहीत? असा सवाल ग्रामस्थांनी केला. आरोपींना कधी अटक करणार, ती तारीख सांगा. तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही. त्यानंतर आम्हा सर्व गावकऱ्यांना गोळ्या घाला, असे म्हणत गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुरुवातीचे 3 दिवस पोलिसांनी नाकाबंदी केली असती, तर आरोपी फरार झालेच नसते. पण पोलिस प्रशासन त्यावेळी सुस्त का राहिले? तसेच पोलिसांवर कुणाचा दबाव आहे, असा सवालही गावकऱ्यांनी पोलिस अधीक्षकांना केला. वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांसमोर आला आहे, मग पोलीस काय करत आहेत? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. पोलिस निरीक्षक महाजन यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.