मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे उद्योगपती तथा टाटा ट्रस्टने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. बोर्डाने त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.
सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार? हा प्रश्न ऐरणीवर आला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. टाटा ट्रस्टने शुक्रवारी बोलावलेल्या एका बैठकीत नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट व टाटा ट्रस्टमधील एक विश्वस्त आहेत. त्यांची कार्यशैली रतन टाटा यांच्याहून फार वेगळी आहे. त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे आवडते.
नवल व सिमोन टाटा यांचे सुपुत्र नोएल हे सध्या ट्रेंट, व्होल्टास, टाटा इन्व्हेस्टमेंट्स आणि टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आहेत. ते टाटा स्टील आणि टायटनचे उपाध्यक्षही आहेत. टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाच्या धर्मादाय संस्थांचा एक समूह आहे. सुमारे 13 लाख कोटींच्या महसूलासह त्याचा टाटा समूहात तब्बल 66% वाटा आहे. टाटा ट्रस्टमध्ये सर रतन टाटा ट्रस्ट व अलाइड ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट व अलाइड ट्रस्टचा समावेश आहे. दारिद्र्य निर्मुलन, आरोग्य सेवा व शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणारा हा ट्रस्ट रतन टाटा यांच्या वारशाचा अभिन्न अंग आहे.नोएल टाटा 2014 पासून ट्रेंट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. ते ट्रेंट ज्युडिओ व वेस्टसाइडचेही ओनर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या 10 वर्षांत कंपनीचे शेअर्स 6,000% पेक्षा जास्त वाढलेत. नोएल यांच्या नेतृत्त्वात कंपनीने अशा वेळी आपल्या कर्मचारी व स्टोअर्सची संख्या वाढवली, जेव्हा तिचे मार्केट पीयर्स कमी होत होते.