महिलांच्या सुरक्षेसाठीच निर्भया पथक तैनात : सोनाली गोडबोले -पाटील ; रिणाती इंग्लिश मिडीयममध्ये महिला दिन कार्यक्रम
अक्कलकोट, दि.१० : हल्ली महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जरी वाढले तरी हे अत्याचार कमी करण्यासाठी पोलिसांकडून निर्भया पथक तैनात आहे.सुरक्षेसाठी महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले पाटील यांनी केले. चपळगाव (ता.अक्कलकोट) येथील रिणाती इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिलांची सुरक्षा’ या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमन पाटील ह्या होत्या.
प्रारंभी संस्थेच्या सचिव रोहिणी पाटील, डॉ. सायली बंदीछोडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पोलीस अधिकारी गोडबोले पाटील यांनी उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. महिलांवरील अत्याचार,सार्वजनिक ठिकाणी कोणी त्रास देत असेल तर काय करावे,बाल विवाह, निर्भया पथकाची निर्मिती व कार्य याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. बंदीछोडे यांनीही महिलांना आरोग्याविषयी समुपदेशन केले. महिलांनी आरोग्य विषयक तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये वेळीच त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक दिगंबर जगताप यांनी संस्थेचे प्रमुख उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची वाटचाल सुरू असून भविष्यातही विविध उपक्रम राबवून शाळेचा लौकिक वाढविणार असल्याचे सांगितले. महिलांसाठी स्पर्धाही आयोजित करण्यात आले होते. संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आले होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा पाटील, धनश्री वाले, अश्विनी सावळे, अर्चना पुजारी आरती नडगीरे, वैष्णवी गायकवाड, निकिता दुलंगे, युसरा पिरजादे आदींनी सहकार्य केले.
नकारात्मक नको
महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास ११२ नंबरची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांना कोणी काही त्रास देत असेल किंवा अडचण असेल त्यांनी थेट या नंबरवरती संपर्क साधावा आणि आपली अडचण दूर करावी. याबाबतीत नकारात्मकता मनामध्ये ठेवू नये – सोनाली गोडबोले पाटील, पोलीस उपनिरीक्षक