युद्ध नको, संवाद हवा :अण्णा हजारे यांचे मोदींना पत्र !
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मानवतेची चिंता; भारताने अहिंसा व संवादाचा मार्ग दाखवावा, अण्णा हजारे यांचे आवाहन
मुंबई : वृत्तसंस्था
मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून भारताने जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत असलेल्या लष्करी संघर्षामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षामुळे निरपराध नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून मानवतेवर मोठे संकट ओढवू शकते, अशी चिंता अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या आठवडाभरात मध्यपूर्वेत तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तेहरा येथे झालेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. आठवडा उलटूनही हा संघर्ष थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “सध्या जग अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. विविध देशांमधील संघर्षामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले आहे. युद्धाच्या आगीत निरपराध महिला, मुले आणि कुटुंबांना सोसाव्या लागणाऱ्या यातना अत्यंत वेदनादायक आहेत,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. अण्णा हजारे यांनी भारताच्या परंपरेचा उल्लेख करत सांगितले की, भारताची संस्कृती ही अहिंसा आणि शांततेची राहिली आहे. भारताने नेहमीच जगाला संवादाचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे या कठीण काळात भारताने पुन्हा एकदा शांततेचा संदेश देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युद्धातून केवळ विनाशच होतो, असे सांगत अण्णा हजारे यांनी संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.“आज जगाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची नाही, तर एकमेकांवरील विश्वासाची आणि संवादाची गरज आहे. युद्धामुळे समस्या सुटत नाहीत; उलट त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. संवादातूनच कायमस्वरूपी समाधान आणि स्थिरतेचा मार्ग मिळू शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अण्णा हजारे यांनी भारताने एक जबाबदार आणि मोठी लोकशाही म्हणून जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली असल्याचे त्यांनी नमूद केले. “या संवेदनशील वेळी जर भारत माणुसकी आणि शांततेच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला, तर ते संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे अण्णा हजारे यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.