मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु होते. आता मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होत आहे. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हा सरकारचा प्रॉब्लेम आहे. ६० ते ७० वर्षे वेळ होता, तेव्हा का आरक्षण दिले नाही, ७ महिन्यांचा वेळ दिला, आता लढाई आरपारची आहे. गोळ्या झेलण्याची वेळ आली तरी चालेल, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. सरकारने काही दगाफटका केला तर हे आंदोलन असेच ताकदीने सुरू ठेवा. सत्तेची धग व मस्ती कोणाच्या डोक्यात गेली असेल तर ती उतरवण्याची जबाबदारी मराठा समाजावर सोडा, असे आवाहन संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील आगसखांड शिवारात आंदोलकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे आलेल्या हजारो मराठा युवकांशी संवाद साधताना जरांगे-पाटील बोलत होते. सकाळी साडेदहा वाजता मिडसांगवी येथे जरांगे-पाटील यांचे आगमन झाले. तेथे मिडसांगवी व भालगावच्या ग्रामस्थांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर खरवंडी येथे खरवंडी, मुंगुसवाडे, ढगेवाडी येथील ग्रामस्थ व महिलांनी आंदोलकांना नाश्ता दिला. येळी, फुंदेटाकळी फाटा, आगसखांड फाटा येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. फुंदेटाकळी फाटा येथे परिसरातील सुमारे पंचवीस गावांतून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
आगसखांड फाटा येथे तालुक्यातील बहुतांश गावांतून जेवण, पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे सभेत जरांगे-पाटील म्हणाले, मी माझे कुटुंब बाजूला सारले असून, मराठा समाज हेच माझे कुटुंब मानतोय. आरक्षणाचा लढा शांततेत लढतोय. सरकार बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतेय महाराष्ट्रात ५४ लाख लोकांच्या कुणबी नोंदी सरकारला सापडल्या आहेत. मग त्यांना प्रमाणपत्र का दिले नाहीत? ही प्रमाणपत्रे तातडीने द्या. मागासवर्गीय आयोगाचे भूत समोर करू नका, ते होईल तेव्हा होऊ द्या, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना प्रमाणपत्र द्या. जनतेने दिलेल्या पाठबळावरच ही लढाई सुरू आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी परत येणार नाही. सरकारने काही दगाफटका केल्यास मागे राहिलेल्या लोकांनी काय करायचे, ते तुम्ही ठरवा. मी मरणाला घाबरत नाही. माझे जीवन मी समाजाला अर्पण केलेय. मेलो तरी चालेल