ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खोटी आश्वासने देऊन काही होत नाही : पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

खोटी आश्वासने देऊन काही साध्य होत नाही. कारण निवडणूक जिंकण्यापूर्वी लोकांची मने जिंकावी लागतात, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. शनिवारी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी ताज्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी मोदींच्या गॅरंटीत दम असल्याचे दाखवून दिल्याचा दावाही केला. तसेच देश विकसित होईल, ही मोदीची गॅरंटी आहे आणि मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे संवाद साधताना मोदींनी विरोधकांवर टीका केली. विरोधी पक्षांनी राजकीय स्वार्थाऐवजी सेवाभाव सर्वतोपरी – ठेवला असता, सेवाभाव हेच आपले – काम मानले असते, तर देशातील – फार मोठ्या लोकसंख्येला कष्ट, – त्रास झेलावा लागला नसता. ज्यांना – कोणी विचारत नव्हते ते माझ्यासाठी पूजनीय आहेत. माझ्यासाठी देशातील प्रत्येक गरीब, शेतकरी, महिला, युवक व्हीआयपी आहे, असे मोदी म्हणाले. निवडणुका सोशल मीडियावर नव्हे तर लोकांमध्ये जाऊन जिंकाव्या लागतात. खोटी आश्वासने देऊन काही साध्य होत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी लोकांची मने जिंकावी लागतात; परंतु आमच्या विरोधकांना हे कळत नाही. ते लोकांना निर्बुद्ध समजतात, असा टोला मोदींनी लगावला.

विकसित भारत संकल्प यात्रा गरजवंतांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे सर्वात मोठे माध्यम असल्याचे सांगत त्यांनी आकडेवारी सांगितली. आतापर्यंत सव्वा कोटीहून अधिक लोक ‘मोदीची गॅरंटी’ वाल्या गाडीपर्यंत पोहोचले आहेत. आधी भीक मागण्याची मनःस्थिती होती, ती आता राहिलेली नाही. एक लाख लोकांनी उज्ज्वला गॅस जोडणीसाठी अर्ज केले, ३५ लाख लोकांना जागेवर आयुष्मान कार्ड देण्यात आले. मोदीच्या गॅरंटीची गाडी गावात पोहोचल्यानंतर प्रत्येक गरजवंत या गाडीपर्यंत पोहोचला पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारी योजनेचा लाभ मिळाल्यानंतर एक विश्वास निर्माण होतो. जगण्याची नवी शक्ती मिळते, असे मोदी म्हणाले. या कार्यक्रमात हजारो लाभार्थी तसेच केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते. सरकारी योजनांचे लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेअंतर्गत गावागावांत एक गाडी येत आहे. लोक या गाडीला मोदीच्या गॅरंटीची गाडी म्हणून ओळखत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!