ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आता शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही ; अजित पवार

मुंबई : वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीच्यापूर्वीच राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावाला काहीच मिळाले नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही लाडक्या भावांसाठी देखील योजना सुरू केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचे वीज बिल भरावे लागणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना वीजेवर अवलंबून राहावे लागणार नसल्याचे ते म्हणाले. सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौर पंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लाडक्या बहिणी बरोबरच लाडक्या भावाची देखील राज्य सरकारने काळजी घेतली असून आता आमच्या शेतकरी भावांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. यापुढे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही. कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला अजित दादांनी सांगितले असा सांगा, असे म्हणत अजित पवार यांनी लाडक्या बहिणी बरोबरच लाडक्या भावांना देखील साद घातली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित दादा यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. या यात्रेची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून झाली आहे. या वेळी त्यांनी मार्गदर्शन करताना लाडक्या बहिणी आणि लाडका भाऊ दोघांनाही त्यांनी साद घातली. मी दहा वर्ष राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे. मी दहा अर्थसंकल्प मांडले आहेत. त्यामुळे कुठे बचत करून योजनांना पैसा देता येतो, हे मला माहिती आहे. लाडकी बहीण योजना ही पुढील पाच वर्ष सुरू राहील, असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!