बारामती : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी जनतेसमोर चूक मान्य केल्यावर देखील पुन्हा अजित पवार विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा निवडणुकीबाबत एक सूचक विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत आपले दुसरे पुत्र जय पवारांना उतरविण्याच्या प्रश्नावर पवारांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती विधानसभेची निवडणूक मी सात-आठ वेळा लढलोय आहे. त्यामुळे आता मला बारामतीत इंटरेस्ट नाही. कार्यकर्त्यांची मागणी असेल, तर जय पवारला संधी देऊया, असे महत्त्वपूर्ण विधान अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे अजित पवार स्वत: थांबून पुत्र जयला रिंगणात उतरविणार का ? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उल्लेखनिय मताधिक्य घेऊन अजित पवारांना मोठा धक्का दिला होता. त्यामुळे पत्नी सुनेत्राचा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. तर बारामतीतील मताधिक्यामुळे शरद पवार गटाचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी चुलते अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी बारामती मतदारसंघात दौरे वाढविले आहेत. लोकसभेनंतर ते चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बारामतीतून जय पवार यांना युगेंद्र पवारांविरोधात उमेदवारी दिल्यास बारामतीकरांना पुन्हा पवार कुटुंबातील चुलत भावांमध्ये काटाजोड लढत पाहावी लागणार आहे.