नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तराखंड व राजस्थानातील प्रचारसभांमधून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य करत आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचारावर अधिक तीव्रतेने प्रहार करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पुढील पाच वर्षांत अभूतपूर्व ऐतिहासिक काम आणि निर्णायक निर्णय होणार असल्याचे सांगत त्यांनी भाजपला आधीपेक्षा अधिक बळकट करण्याचे आवाहन मतदारांना केले.
उत्तराखंडच्या रुद्रपूर येथे ‘विजय शंखनाद’ सभेला संबोधित करताना मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ एकजूट झालेल्या विरोधकांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत, ही निवडणूक उघडपणे दोन गटांमध्ये लढण्यात येत असल्याचे नमूद केले. एकीकडे आम्ही प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने जनतेला सामोरे जात आहोत, तर दुसरीकडे भ्रष्टाचारी, घराणेशाही असलेल्या लोकांची टोळी आहे. हे भ्रष्टाचारी मला धमक्या देतात. दिवस-रात्र शिव्या देतात, असे मोदी म्हणाले.
यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. काँग्रेसच्या शाही कुटुंबातील युवराज म्हणतात की, जर तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आले तर देशात आग लागेल. ६० वर्षे देशावर राज्य करणारे १० वर्षे सत्तेबाहेर राहिले तर देश पेटवण्याची भाषा बोलत आहेत. आणीबाणी लावणाऱ्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यामुळे ते जनादेशाविरोधात लोकांना चिथावणी देत आहेत. काँग्रेस देशाला अराजकता, अस्थिरतेकडे घेऊन जात आहे. लांगूलचालनाच्या राजकारणाच्या दलदलीत रुतलेला काँग्रेस देशहिताबद्दल विचारच करू शकत नाही, असा घणाघात मोदींनी केला.
पंतप्रधानांनी ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजने’ चा उल्लेख करत यामुळे कोट्यवधी लोकांना मोफत वीज मिळेल आणि त्यांची कमाईदेखील होईल, असे सांगितले. देशासाठी काम करताना मी थकत नाही आणि थांबतही नाही, कारण मजेसाठी नाही तर मेहनत करण्यासाठी माझा जन्म झाला आहे, असे मोदी म्हणाले.