मुंबई : वृत्तसंस्था
विधानभवन परिसरात भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाहताच शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अरे व्वा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे असे वक्तव्य केले. मात्र लगेच सावरत राजकीयदृष्ट्या नव्हे तर चहा पिण्यासाठी एकत्र येऊया, असे मिश्कीलपणे म्हणत मी माझी लाईन कधीही चुकत नसल्याचे राऊत म्हणाले. राऊत यांच्या या फिरकीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र या दोन्ही नेत्यांची भेट आणि संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची विधानभवनात दिवसभर चर्चा होती.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शुक्रवारी विधानभवनात आलेल्या संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर अचानक भेट झाली. यावेळी त्यांच्यात झालेली ही चर्चा उपस्थित कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्हीही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत. आमचे त्यांचे व्यक्तिगत भांडण नाही. ते वैचारिक भांडण आहे. इतकी वर्ष एकमेकांसोबत काम केले आहे, त्यामुळे भेटीगाठी होत असतात. महाराष्ट्राचे राजकारण निर्मळ होते, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात विषाचा प्रवाह दुर्दैवाने भाजपने सुरू केला, असेही यावेळी राऊत म्हणाले.