ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सात जागांसाठी सातच अर्ज; राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता ; खा.सुळे !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील सहकार्याची आणि सौहार्दाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आज संध्याकाळी साडेसहा वाजता ‘मातोश्री’ येथे जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल ठाकरे कुटुंबाचे आभार मानण्यासाठी ही भेट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा अखेरचा दिवस होता. सात जागांसाठी एकूण सातच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. या निवडणुकीत भाजपकडून चार उमेदवार, शिवसेना शिंदे गटाकडून एक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एक आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा अर्ज दाखल झाला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. त्यांनी सांगितले की, ठाकरे आणि पवार कुटुंबांमध्ये गेली सहा दशके जिव्हाळ्याचे संबंध आहेत. “२००६ मध्ये मी पहिल्यांदा राज्यसभेत गेले, तेव्हा आदरणीय बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि माझी निवडणूक बिनविरोध झाली होती. आज जवळपास २० वर्षांनंतर ते आपल्यात नाहीत, पण शिवसेना आणि काँग्रेसने दाखवलेली ही समंजस भूमिका म्हणजे महाराष्ट्राची खरी ‘आण-बाण-शान’ आहे,” असे सुळे म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात विरोधक हा शत्रू नसतो; मतभेद असले तरी ती वैचारिक लढाई असते. हीच राजकीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न सर्व पक्ष करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे अर्ज भरण्यावेळी उपस्थित नसल्याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, “आज सर्वजण सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबातील लग्नसमारंभाला गेले आहेत. मी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना भेटले होते. आज पुन्हा मातोश्रीवर जाऊन त्यांचे आभार मानणार आहे.”

शरद पवार यांच्या उमेदवारीला राष्ट्रीय पातळीवरही समर्थन मिळत असल्याचे सुळे यांनी सांगितले. “काल माझे अखिलेश यादव यांच्याशी बोलणे झाले. त्यांनीही सहकार्याची भूमिका व्यक्त केली. कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि गेली अनेक वर्षे पवारांसोबत राहिलेले सर्व सहकारी आज आमच्यासोबत उभे आहेत,” असे त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीबरोबरच ‘INDIA’ आघाडीतील पक्षांनी दाखवलेल्या एकजुटीबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

याच निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पहिल्यांदाच राज्यसभेत जाणार आहेत. त्यांना काय सल्ला द्याल, असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांनी दिलेला मंत्र सांगितला. “लोकसभा किंवा राज्यसभेत गेल्यावर कान उघडे ठेवावेत आणि कमी बोलावे. जेव्हा बोलाल तेव्हा अत्यंत अभ्यासपूर्ण बोलावे. कारण तिथे बसलेला प्रत्येक व्यक्ती आपल्यापेक्षा अधिक जाणकार असतो आणि संपूर्ण देश आपल्याकडे पाहत असतो,” असा सल्ला त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!