ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेऊ ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येत आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे तसेच विनंती देखील केली आहे की मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या आधी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेऊ, असे म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, सरकारला एक विनंती आहे तुम्ही व्यासपीठावर सांगितले होते की हैदराबाद गॅझेट आपण लागू केले आहे. मला तुम्हाला स्पष्ट सांगणे आहे तुम्हाला काय करायचे काय नाही ते तुम्ही बघा, 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे, त्याआधी हैदराबादच्या गॅझेटच्या नुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू केली पाहिजे. येत्या कॅबिनेटमध्ये आपण ही प्रक्रिया सुरू करावी आणि अंमलबजावणी करण्यात यावी. 17 सप्टेंबरच्या आधी ही प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आहे.

तुम्ही ठरवलेच आहे तर मनुष्यबळ द्या, तातडीने कामाला लावा आणि हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी अन्यथा मला मोठे पाऊल घ्यावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळे आली नाही पाहिजे. मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या म्हटले की अर्धा महाराष्ट्र पागल झाला. म्हणजे गरिबांच्या पोरांनी आणि मी आम्ही जीआर काढला तेव्हा काही अभ्यासक सुद्धा पागल झाले. आमचे विरोधक तर इतके पागल झाले आहेत की त्यांना झोपाच येत नाहीत. मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार.

एकदा आपले सगळे मराठे आरक्षणात जाऊ द्या त्यानंतर आणखी मोठा आनंद साजरा करू. त्यामुळे मराठ्यांनी थोडे संयमाने घ्या. 17 सप्टेंबरच्या आधी जर मराठवाड्यातल्या मराठ्यांना जर कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू नाही झाली तर येत्या दसरा मेळाव्याला आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागेल सरकारच्या विरोधात. कारण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की आम्ही हैदराबाद गॅझेट लागू केले. तर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या आधी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करावी.

नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. आता मला शंभर टक्के खात्री आहे की आता मराठ्यांचा अपमान होणार नाही आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार. मराठे शंभर टक्के जिंकले आहेत. मुंबईत जाऊन आपण खूप मोठी लढाई जिंकली. हा विजय अनेकांना पचत नाही. आपल्या लेकरांना काय मिळवायचे काय द्यायचे ते आपण बघून घेऊ, बाकीचे नाटके बंद. काही शब्द चुकले तर ते सरकारने बघून घ्यायचं. आम्हाला व्यासपीठावर येऊन सांगितले की हैदराबाद गॅझेट लागू केले, तर आता त्यानुसार प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी.

मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि विखे पाटलांना सांगतो, आमच्या जीआरमध्ये जर येवला वाल्याचे ऐकून जर काही शब्दात हेराफेरी जर केल्या तर एक लक्षात ठेवा 1994 चा जीआर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आणि न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार. आम्ही तुमच्या मुळावर उठणार. आम्ही खूप संयम पाळला, आता बास. त्यामुळे 17 सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!