ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संतापजनक : तिसरीतील पाच मुलींचा जिल्हा परिषद शिक्षकाकडून विनयभंग

अहमदनगर : वृत्तसंस्था

राज्यातील बदलापूर प्रकरणानंतर अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात महिला तसेच शालेय मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खराडी जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकानेच तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे.

खराडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या तिसरीच्या काही मुलींशी बाळशीराम यशवंत बांबळे या विकृत शिक्षकाने असभ्य वर्तन केले आहे. दुपारच्या सुट्टीत एक मुलगी रडतच घरी गेली व तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तातडीने मुख्यध्याकांची भेट घेत तक्रार केली. मुख्यध्यापकांनी सर्व मुलींना बोलावून चौकशी केली तेव्हा या शिक्षकाचे सगळेच कारनामे समोर आले. या शिक्षकाने इतर चार ते पाच मुलींशी सुद्धा असेच गैरवर्तन केले असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळशीराम यशवंतराव बांबळे हा नव्याने शाळेत रुजू झाल्यापासूनच असे प्रकार घडण्यास सुरू झाले असल्याचे पुढे आले आहे. पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने या शिक्षकाच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या शिक्षकाच्या विरोधात बीएनएस कलम 74, 75, बालकांचे लैंगिक अत्याचार कलम 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत.

दरम्यान, बदलापूरच्या शाळेत झालेल्या घटनेनंतर अशा अनेक घटना राज्यात घडत आहेत. यामुळे शाळेत मुलींना पाठवायला देखील आता पालकांना भीती वाटत आहे. ज्या शिक्षकांच्या भरोशवर पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात तेच असे कृत्य करत असतील तर कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळात अशा घटना का वाढत आहेत, यावर ठोस उपाययोजना व कडक कारवाई तातडीने कशी करता येईल यावर विचार होणे आता आवश्यक झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!