पैठण, वृत्तसंस्था
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण राज्यातलं वातावरण तापले आहे. या हत्येतील आणखी एक आरोपी अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. दरम्यान सरपंच देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज मोर्चा काढण्यात आला. लाखोंचा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झाला असून मनोज जरांगेही या मोर्चात उपस्थित राहिले. तसेच देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून आरोपींना पकडण्याची मागणी करणारे, हे प्रकरण सतत लावू धरणारे भाजप आमदार सुरेश धसही या मोर्चात सहभागी होणार आहेत.
आज 9 जानेवारी, देशमुख यांच्या हत्येला आजच एक महीना उलटला असून त्यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंना आजही खळ नाही. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडून त्यांनाही तशीच कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केवळ त्यांचे कुटुंबियच नव्हे तर संपूर्ण बीडमधील आणि राज्यातील नागरिक करत आहेत. या हत्येच्या निषेधार्थ विविध आंदोलने करण्यात आली, मोर्चेही काढण्यात आले. त्यामध्ये शरद पवारांपासून कित्येक बडे नेतेही सहभागी झाले .
देशमुख यांच्या क्रूर, निर्घृण हत्येचा राग, संताप आजही लोकांच्या मनात असून छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्येही आज एक विराट मोर्चा काढण्यात आला , त्यामध्ये संतोष देशमुख यांचा भाऊ, त्यांची मुलगी, मुलगा यांच्यासह हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले. हातात काळे झेंडे तसेच फलक घेऊन, संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत हजारो लोक पैठणच्या रस्त्यावर उतरले. सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तर होतेच पण निर्घृण खून करणाऱ्या मारेकऱ्यांविषयीचा अतोनात संतापही त्यांच्या डोळ्यात धुमसत होता.
पैठणमधील स्टेडियमवरून सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचणार असून तिथे एक निषेध सभाही होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील, सुरेश धसही उपस्थित असतील. याच मोर्टामध्ये सोनाथ सूर्यवंशी यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या मारेकऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्याची मागणी या मोर्चात करण्यात आली .
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात दोन गट आमनेसामने आले होते. मंत्री धनंजय मुंडे समर्थक आणि आमदार सुरेश धस समर्थक आमनेसामने आले, दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. मुंडे समर्थकांकडून मनोज जरांगे पाटील, सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तर धस गटाकडून अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वेळी करण्यात आली.पाटोदा पोलीस ठाण्यात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभरातील ग्रामपंचायतींनी काम बंद आंदोलन सुरू केलं. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव ग्रामपंचायतीचे काम बंद आंदोलनाला सुरुवात झाली. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, देशमुख कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत समाविष्ट करावे, तसेच उपसरपंच आणि ग्रामसेवकांना संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्या करत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.