ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पाणंद रस्त्याची योजना प्राधान्य क्रमावर घेणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमरावती, दि. 14: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी पाणंद रस्ता आवश्यक आहे. ज्याप्रमाणे महामार्ग महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पाणंद रस्ता महत्वाचा आहे. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन पाणंद रस्ता ही योजना प्राधान्य क्रमावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेस निधी आणि निर्णय प्रक्रिया गतीने होण्यास मदत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

आज अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात अचलपूर आणि चांदूरबाजार या तालुक्यातील सहाशे किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती दर्शवली. त्यावेळेस ते बोलत होते.

अचलपूर येथील कार्यक्रमाला राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह नगराध्यक्ष सुनीता फिसके, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार आदी उपस्थित होते

दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, किरण सरनाईक, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, विदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या दुसऱ्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहत आहे. या कार्यक्रमाआधी नागपूर येथील विधी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर अचलपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे. हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.

शेतकऱ्यांना वीज, पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे शेतामध्ये पोहोचण्यासाठी पाणंद रस्ते महत्त्वाचे आहे. राज्याच्या विकासासाठी ज्याप्रमाणे महामार्ग आवश्यक आहेत, त्याप्रमाणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाणंद रस्त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्याची क्षमता या पाणंद रस्त्यामध्ये आहे. या रस्त्याचे खडीकरण झाल्यास शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर पोहोचणे सुलभ होईल.

शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे यास उशीर होत आहे. कोरोनाचे संकट हे अधिक आहे. परंतु शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काही शक्य आहे, त्या कामांना प्राधान्य दिले जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाईल. ज्याप्रमाणे आज पाणंद रस्त्याचा विषय मार्गी लागला आहे, अशाच पद्धतीने एकजुटीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी सरकार सोबत असावे. आज पाणंद रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे, ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

श्री. थोरात यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सुरुवातीला स्वर्णजयंती कार्यक्रमांमध्ये पाणंद रस्त्याचा कार्यक्रम समावेश केला होता. पाणंद रस्त्याचा हा विषय तहसीलदाराच्या स्तरावर मिटवू शकतो. परंतु त्यामध्ये असंख्य अडचणी येतात. पाणंद रस्त्याचा विषय मार्गी लागण्यासाठी ही एक चळवळ व्हावी. सर्वांच्या सहमती, सामंजस्याने वाद सुटावेत. यात श्रमदानाचाही उपयोग करून घेता येईल. शासनाने याकामी जागा मोजण्याची मदत केल्यास पाणंद रस्ते गतीने पूर्ण होण्यास मदत होईल. केंद्र आणि राज्याच्या रोजगार हमी योजनेमधून मोठ्या प्रमाणावर कामे झाल्यास याला शेतकऱ्यांचाही पाठिंबा मिळेल.

श्रीमती. ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यात पाणंद रस्त्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांचा कणा आहेत, ही बाब ओळखून जिल्हा नियोजन आणि इतर योजनामधून सोळाशे किलोमीटरचे पाणंद रस्ते यावर्षी हाती घेतले आहे. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन मातोश्री पाणंद योजना राबविल्यास शेतकऱ्यांच्या मदतीला हे सरकार धावून आले आहे, अशी शेतकऱ्यांमध्ये धारणा होईल. या रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरण व्हावे, यासाठी राज्य शासनाने पाठबळ द्यावे, अशी मागणी केली.

श्री. भुमरे यांनी रोजगार हमी योजनेतून ही कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतल्यास पाणंद रस्त्यासोबतच पक्के रस्ते होण्यास मदत मिळेल. राज्य शासनाने मातोश्री पाणंद योजना हाती घेऊन यास भरीव निधी दिल्यास हा विषय राज्यस्तरावर मार्ग निघू शकेल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविकातून श्री. कडू यांनी विविध स्तरावरील पाठपुरावा यातून बळीराजा पाणंद विकास अभियान मार्गी लागले आहे. एक किलोमीटरच्या रस्त्याची किंमत आठ लाखांपर्यंत कमी करण्यात आली आहे. या कामासाठी स्थानिक निधीमधून तसेच उपलब्ध गौण खनिज यामधून रस्ते पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वांची मदत घेऊन दोन तालुक्‍यातील सुमारे 600 किलोमीटरचे रस्ते 25 मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्यांचे मजबुतीकरण केल्यास शेतकऱ्यांचा पाठिंबा राहील. पाणंद रस्त्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी तातडीने दिल्यामुळे राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.

उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी सूत्रसंचालन केले. रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी आभार मानले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!