अक्कलकोट, दि.१४ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा व पाळणा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अतिशय साधेपणाने आणि मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रकट दिनानिमीत्त कोल्हापूर येथील स्वामी समर्थ लाईट डेकोरेटर्स यांच्या वतीने अविनाश सुर्यवंशी व सहकाऱ्यांनी वटवृक्ष मंदीरास आकर्षक विद्युत रोषणाईची सेवा स्वामी चरणी रुजू केली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार मंदीर बंद आहे.त्यामुळे मंदीर समितीचे पदाधिकारी, कर्मचारी व मोजके सेवेकरी वगळता अन्य कोणत्याही भाविकांना या सोहळ्यात सहभागी होता आले नाही.मात्र मंदीरातील श्रीचे नित्योपचार व आरती नियमीतपणे सुरू आहेत.प्रकट दिनी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत करण्यात आली.
यानंतर स्वामी पुण्यतिथी निमित्त आज प्रकटदिनापासून पुण्यतिथीपर्यंत पहाटे ४ वाजता निघणारी प्रभातफेरीची अनेक वर्षांची परंपरा यंदा सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या व्यत्ययामुळे खंडीत झाल्याची माहिती इंगळे यांनी दिली.दरम्यान दुपारी १२ वाजता मंदिरातील गाभारा मंडपात पुरोहित मंदार पुजारी व महेश इंगळे यांच्या हस्ते मंदीर समितीचे पदाधिकारी व मोजके सेवेकरी यांच्या उपस्थितीत गुलाल, पुष्प वाहून, भजन गीताने पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर श्रींची नैवेद्य आरती संपन्न झाली.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सद्या मंदीर बंद असल्याने अनेक भाविकांना स्वामी दर्शनापासून वंचित रहावे लागत असल्याची खंत मनामध्ये असून या कोरोना संक्रमणाशी लढण्याकरिता प्रत्येकास स्वामी समर्थानी बळ द्यावे व लवकरात लवकर या जागतिक संकटातून सर्वांना स्वामींनी सुखरूपरित्या तारून घ्यावे याकरिता स्वामींच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे चेअरमन महेश इंगळे यांनी सांगितले.यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, कौसल्या जाजू, संपतराव शिंदे,पोलीस निरीक्षक विजय जाधव,पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी,धनराज शिंदे, रामचंद्र समाणे, बाळासाहेब घाटगे, मल्लीनाथ स्वामी, प्रथमेश इंगळे, श्रीपाद सरदेशमुख, राजेश निलवाणी, श्रीपाद सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, सागर गोंडाळ आदी उपस्थित होते.










