अंशदान हिशोबासाठी पंचायत समितीवर हलगीनाद आंदोलन, मृत कर्मचारी कुटुंबियांची परवड थांबविण्याची पेन्शन संघटनेची मागणी
अक्कलकोट:-अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कपात रकमेचा हिशोब शासन हिस्सा व व्याजासह मिळावा या प्रमुख मागणीसह मृत कर्मचाऱ्यांची कपात रक्कम तातडीने कुटुंबियांना देऊन मृत कर्मचारी कुटुंबियांची होणारी परवड थांबविण्यात यावी यासाठी 1 डिसेंबर 2022 रोजी पंचायत समिती अक्कलकोटवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने हलगीनाद आंदोलन आयोजित केल्याची माहिती अक्कलकोट तालुका पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली. यामध्ये दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मूळ वेतन व महागाई भत्ता यांच्या 10 % रक्कम अंशदान कपात म्हणून कपात करण्यात येत होती.अंशदान कपात रक्कमेमध्ये तितकाच शासनहिस्सा व त्यावर व्याज यातून मिळणारी रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्यातून मिळणारी रक्कमेवर निवृत्तीवेतन देण्याची योजना आहे.अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनातून 2009 पासूनचा अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा हिशोब दीर्घकाळापासून प्रलंबित असून परिपूर्ण हिशोबासाठी संघटनेच्या वतीने सातत्याने अर्ज,विनंती,प्रत्यक्ष भेटून,चर्चा करून,निवेदन देऊन प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आंदोलनाचा पर्याय निवडण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
एन.पी.एस खात्यावर रक्कम वर्ग होण्यास विलंब
शासनाने परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना बंद करून त्याऐवजी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्वीकारली असून अंशदान योजनेंतर्गत कपात रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यावर वर्ग करण्यासाठी मार्च 2021 ची मुदत देण्यात आलेली होती.अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा मागील अंशदान कपात रकमेचा हिशोबच पूर्ण नसल्याने रक्कम एन.पी.एस खात्यावर वर्ग होण्यास विलंब होत असून यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून नुकसान तात्काळ थांबवून परिपूर्ण हिशोबासह रक्कम एन.पी.एस खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही करण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी, आशिष चव्हाण, सैदप्पा कोळी, राजशेखर करपे,विक्रम जाधव, अरुण पांचाळ,समीर कुलकर्णी, सिद्धाराम गायकवाड, गिरीश हवालदार, ज्ञानेश्वर केंद्रे, तानाजी चव्हाण,महादेव पाटील,विजयकुमार बिराजदार, श्रीशैल वाडेद, हन्नुरसिद्ध कोळी, लक्ष्मीपुत्र लिंबीतोट, मनोज कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.