सोलापूर, वृत्तसंस्था
पंढरपुरात श्रीविठ्ठल- रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे सुलभ व वेळेत दर्शन व्हावे, यासाठी तिरुपती व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर टोकन दर्शन पद्धती राबविण्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करून देण्याबाबत टीसीएस कंपनीला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावर या कंपनीने मोफत संगणक प्रणाली विकसित करून देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन व जीर्णोद्धार कामाचा आढावा घेण्यात आला.
कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करावीत, अशा सूचना पुरातत्त्व विभाग व संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या. तसेच तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर मालमत्ता अधिकारी नियुक्त करणे, श्रीक्षेत्र आळंदी येथे मंदिर समितीसाठी जागा उपलब्ध करून घेणे, २०२५ मधील ‘श्रीं’च्या पूजा ऑनलाइन बुकिंग करणे, रक्षक सिक्युरिटी कंपनीविषयी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने त्यांना अंतिम नोटीस देणे, मंदिरातील निर्माल्यापासून धूप- अगरबत्ती तयार करण्याबाबत थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजीज, पुणे यांनी कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही न केल्याने प्रस्ताव रद्द करून ऋषीकेश भट्टड, पंढरपूर यांचा प्रस्ताव योग्य त्या अटी व शर्तीवर मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.