ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पार्थ पवार प्रकरण : शरद पवारांची सरकारकडे मोठी मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या तीन दिवसापासून राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप विरोधक करीत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा कथित भूखंड घोटाळा हा एक गंभीर विषय असल्याचे म्हटले आहे. पार्थ पवारांचे प्रकरण एक गंभीर विषय आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर असल्याचे सांगत असतील, तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव स्थिती समाजापुढे ठेवली पाहिजे, असे ते म्हणालेत.

अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींत घेतल्याप्रकरणी अडचणीत सापडलेत. विरोधकांनी या प्रकरणी अजित पवारांवर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल महिन्याभरात आल्यानंतर सरकार या प्रकरणी योग्य ती कारवाई करेल. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शनिवारी अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधताना या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार म्हणाले, सरकारने कालच या प्रकरणी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती एका महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय होते ते पाहू. पण राज्यात भाजप व त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. ते पुढे कोणते पाऊल उचलतात हे पाहावे लागेल.

पत्रकारांनी यावेळी पवारांना या प्रकरणी अजित पवारांना जाणिवपूर्वक घेरण्याचा प्रयत्न होत आहे का? असा प्रश्न केला. त्यावर शरद पवारांनी आपल्याला हे सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले. हे मला सांगता येणार नाही. पण हा एक गंभीर विषय आहे असे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव स्थिती समाजापुढे ठेवली पाहिजे. हे काम त्यांनी करावे अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!