अक्कलकोट, दि.१७ : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सुधारित तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या विकास आराखड्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबईत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्चाधिकार समितीकडून या प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे विकास कामे मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या बैठकीला सहसचिव राजेंद्र क्षीरसागर, वित्त विभागाचे सचिव ओमप्रकाश गुप्ता, नियोजन विभागाचे राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जवळीकर यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्याधिकारी सचिन पाटील व इतर आदी अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी २०१८ मध्ये १६६ कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर करण्यात आला होता. सदर आराखड्याला मान्यता मिळण्यासाठी नगर विकास विभागाने उच्च अधिकार समितीच्या बैठकीसाठी हा विषय सादर केला होता. परंतु त्यावेळी बैठक झाली नव्हती. यानंतर नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर ३६८ कोटींचा अंतिम आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यात आठ प्रमुख बाबींसाठी ४२ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
यामध्ये प्रामुख्याने
वाहतनळांचा विकास – वाहनतळ, वॉटर एटीएम व भूसंपादन रु.४३.४५ कोटी,रस्ते विकास – रस्ते विकास व भूसंपादन २१४.५० कोटी, शौचालय बांधकाम – सुलभ शौचालय निर्मिती ४.५० कोटी, पाणीपुरवठा व यंत्र खरेदी – पाणीपुरवठा व नाला बांधकाम ५३ कोटी, उद्यानांचा विकास – हत्ती तलाव व उद्यांनाचा विकास १३ कोटी, विद्युतीकरणाची कामे – महावितरणकडील कामे ६.५६ कोटी, व्यापारी केंद्र व अनुषंगिक सेवा – व्यापारी केंद्र व भक्त निवास २५.७० कोटी, इतर कामे – चौक सुशोभिकरण ८ कोटी असे एकूण ३६८.७१ कोटी रुपये लागणार आहेत. या विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.