मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाचा लढा अनेक नेत्यांकडून सुरु असतांना नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी येत्या २५ जुलै पासून आरक्षण बचाव यात्रा सुरु करीत असून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही या यात्रेत सहभागी होण्याची मी वाट पाहत आहे, असे आंबेडकर आपल्या पत्रात म्हणालेत.
प्रकाश आंबेडकरांच्या पत्रानुसार, आरक्षण बचाव यात्रा येत्या 25 जुलै रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार आहे. ही यात्रा त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्याला भेट देईल. आंबेडकरांनी या यात्रेसाठी बडे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रित केले होते. पण भुजबळांनी अद्याप या यात्रेत सहभागी होणार किंवा नाही हे स्पष्ट केले नाही.
वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा मुंबईतून 25 जुलै रोजी निघेल. त्यानंतर ती पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना येथे जाईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे यात्रेचा समारोप होईल.
ओबीसी घटकांची मागणी होती की, ओबीसी आरक्षणासंदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका गावोगावी गेली पाहिजे. त्यामुळे पक्षाच्यावतीने आम्ही ठरवले की, या सामाजिक संघटनांना सोबत 25 जुलैला दादर, चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करायची आणि त्याच दिवशी फुलेवाडा येथे जायचे. 26 तारखेला राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. त्यामुळे आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.