अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
थकीत व पुरवणी देयके अदा करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडून जवळपास ५९ कोटी रुपये इतका निधी जिल्हा परिषदेस प्राप्त झाला होता.३१ मार्च पूर्वी शालार्थ वेतनप्रणालीद्वारे देयके सादर करणेबाबत शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देऊन अक्कलकोट शिक्षण विभागाने विहित मुदतीत देयके सादर न केल्याने अक्कलकोट तालुक्यातील दीर्घ कालावधीपासून प्रलंबित देयके मिळण्यापासून शिक्षक वंचित राहिल्याने शिक्षकांत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.
याबद्दल अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्याने तातडीने ऑफलाईन पद्धतीने देयके अदा करण्याची फेरमागणी जिल्हा शिक्षक समितीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. दि.३१ मार्च २०२४ नंतर थकीत व पुरवणी देयकांसाठी निधी उपलब्ध न झाल्याने शिक्षकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबणा होत होती.त्यामुळे चालू आर्थिक वर्षात मुख्याध्यापकांनी विहित वेळेत देयकेसादर केली होती. मात्र गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने मुदतीत देयके सादर केली नाहीत.
त्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त होवूनही अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक थकीत व पुरवणी देयकांपासून वंचित राहिले आहेत.जवळपास ९० लाखांपेक्षा अधिक निधी परत गेल्याने शिक्षकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबणा होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील केवळ अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके अदा झालेली नाहीत. प्राप्त होणारा निधी हा वेतन लेखाशीर्ष २२०२०१७३-३६ ह्या लेखाशीर्षावर जमा होत असल्याने तातडीने ऑफलाईन पद्धतीने थकीत व पुरवणी देयके अदा करण्यात यावीत.थकीत व पुरवणी देयके तातडीने अदा झाल्यानंतर मुख्याध्यापक पदोन्नती फरक,वरिष्ठ वेतनश्रेणी फरक,विषय शिक्षक वेतनश्रेणी फरक,सहावा व सातवा वेतन आयोग फरक,आंतरजिल्हा बदलीने हजर शिक्षकांचे वेतन व अन्य फरक शिक्षकांना मिळणार आहेत.यावेळी शिक्षक नेते दयानंद चव्हाण,अन्वर मकानदार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.