ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कडाक्यांच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकांनी पेटवल्या शेकोट्या..! राज्यात ४८ तासांत थंडीचाजोर आणखी वाढण्याचा हवामान खात्यानं वर्तवला अंदाज

मुंबई : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचं सरासरी तापमान हे ४ ते ६ अंशानं खाली घसरलं आहे. परिणामी नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबादसह जळगाव जिल्ह्यांत पारा खाली आल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे. इतकंच नाही तर गेल्या आठवड्याभरापासून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही हुडहुडी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं आता या थंडीमुळं रब्बीच्या पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. तर शहरात कामानिमित्त सकाळी बाहेर पडणाऱ्या लोकांसाठी दररोज पडणारी कडाक्याची थंडी डोकेदुखी ठरत आहे.

हिमालयातून येणाऱ्या अतिशित वाऱ्यांमुळं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील तापमानात घट झाली असून त्यामुळं थंडीचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तापमाराचा पारा खाली आल्यामुळं लोकांना मोठ्या प्रमाणात थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं आता विदर्भासह मराठवाडा आणि खानदेशात थंडीची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. कडाक्यांच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकांनी शेकोट्या पेटवल्या असून अनेकांनी उबदार कपडे घालायला सुरुवात केली आहे.

उत्तर भारतातून येणाऱ्या अतिशित वाऱ्यांचा महाराष्ट्रात पहिला शिरकाव हा खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात होत असल्यानं तेथील अनेक जिल्ह्यांचं तापमान झपाट्यानं खाली आलं आहे. तर दुसरीकडे कोकणातील जिल्ह्यांसह मुंबईतील तापमानात फारशी घट झालेली नाही. त्यामुळं कोकणातील वातावरणात गारठा आणि राज्यातील इतर भागांमध्ये येत्या ४८ तासांत थंडीचाजोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याशिवाय काही ठिकाणी दृश्यमानता कमी होऊन दाट धुकं पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!