लातूर : वृत्तसंस्था
आजची राजकीय स्थिती भयावह आहे. समोरचे केवळ आश्वासने देऊन झुलवत ठेवतात, काँग्रेस काम करणारा पक्ष आहे. सध्या सत्तेत खोटे बोलणारे लोक आहेत. २०१४ पूर्वी विरोधात असताना धनगर समाजाला आरक्षण देतो, असे म्हणणाऱ्यांनी आजही आरक्षण दिले नाही. टाटा कन्सल्टन्सी या खासगी संस्थेचा अहवाल न्यायालयाने नाकारला. यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषयच आता रद्दबातल झाला आहे. हे सरकार मराठा समाजाचीही फसवणूक करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केला.
रविवारी लातूर तालुक्यातील निवळी (वैशालीनगर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणप्रसंगी ते बोलत होते. पटोले म्हणाले, काँग्रेस पक्षातील तट (अशोक चव्हाण) आता बाहेर गेले आहेत. यामुळे यापुढे काँग्रेस हाच एक गट अस्तित्वात आहे. काँग्रेस कधीही न संपणारी चळवळ आहे. काँग्रेसला संपवणारे गेले, काँग्रेस अजूनही शिल्लक आहे,
माझे राजकीय गुरू स्व. विलासराव देशमुख यांच्या या भाषणाचा हा व्हिडीओ मी सोशल मीडियावर व्हायरल केला होता, त्याला लाखो लोकांनी पसंती दिली. मराठा समाजाला कसे आरक्षण देणार, यावर येत्या अधिवेशनात चर्चा घडवण्यासाठी अग्रेसर राहणार आहोत, या सरकारने मराठा-ओबीसी वाद लावला आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याची अधिसूचना काढली. अध्यादेश काढण्याचे नाव नाही, हे सरकार मराठा समाजाचीही फसवणूक करणार आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.