ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महापालिका दालनात टिपू सुलतानचा फोटो; शिवसेनेचा ठिय्या आंदोलन

मालेगाव : वृत्तसंस्था 

नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांनी महापालिका मुख्यालयातील आपल्या दालनात टिपू सुलतान  यांचा फोटो लावल्याने शहरात तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत आयुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अखेर शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारपर्यंत सामोपचाराने संबंधित फोटो काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर सेना पदाधिकारी व नगरसेवक परतले.

महापालिका मुख्यालयात महापौर व उपमहापौर यांची स्वतंत्र दालने आहेत. उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आल्याचा फोटो शुक्रवारी सकाळपासून समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यावरून राजकीय वाद पेटला.

दुपारी शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या कार्यालयात धडक देत शासकीय इमारतीतील प्रोटोकॉलनुसार लावण्यात येणाऱ्या छायाचित्रांची माहिती विचारली. तसेच संबंधित फोटो तात्काळ हटवण्याची मागणी केली. या वेळी सायने बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच शिवस्मारकाचा प्रस्ताव पहिल्याच महासभेत महापौर नसरीन शेख यांनी मांडल्याबद्दल सेना पदाधिकाऱ्यांनी कौतुक व्यक्त केले.

वाद वाढत असल्याचे लक्षात घेऊन आयुक्त जाधव यांनी नगरसचिवांना उपमहापौरांना सूचित करण्याचे निर्देश दिले. ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय दुसाने, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, गटनेते नीलेश आहेर, युवा जिल्हाप्रमुख विनोद वाघ, नगरसेवक दिनेश ठाकरे यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला. दरम्यान, आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असून शनिवारी दुपारपर्यंत फोटो हटवण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!